मोरु
A short story by Sane Guruji

म्हणून एक विद्यार्थी होता. आईबाबांपासून दूर एका शहरात तो विद्येसाठी राहत होता. त्याने एक खोली घेतली होती. तो फारसा श्रीमंत नव्हता, म्हणून तो हातानेच स्वयंपाक करी. त्याच्या खोलीत बिजलीची बत्ती नव्हती. साधा देशी कंदीलच होता. त्याच्या खोलीत तेलचूल (स्टोव्ह) नव्हती; साधी मातीचीच चूल होती. त्याच्या खोलीत फरशी नव्हती; साधी जमीनच होती. मोरुची खोली लहानशीच होती. मोरु व्यवस्थित नव्हता. त्याला कामाचा अक्षयी कंटाळा. चूल कधी सारवायचा नाही. जमीन सारी उखळली हेती. कंदिलाची काच काळी झाली होती. अंगातील कपडे मळले होते, निजावयाची सतरंजी, तिच्यात खंडीभर मळ साचला होता. तरी मोरु तसाच राहत होता. अगदीच ओंगळ व ऐदी.
एके दिवशी मोरु फिरायला गेला होता. एकटाच लांब फिरायला गेला. एका वडाखाली एक मनुष्य बसला होता. मोरु त्याच्याकडे पाहू लागला. त्या माणसाच्या डोळ्यांतून पाणी येत होते. मोरुने त्याच्याजवळ जाऊन "तुम्ही का रडता?" असे विचारले. त्या मनुष्याला जास्तच हुंदका आला.
मोरु- तुम्ही असे मुलासारखे ओक्साबोक्शी का रडता? मनुष्य- आजूबाजूचे रडणे ऐकून मलाही रडू आले. मोरु- कोण रडत आहे? मला तर कोणाचे रडणे ऐकू येत नाही. मनुष्य- तुझे कान तिखट नाहीत. तुम्ही सारे बहिरे झालेले आहात. तुमच्या कानात मळ भरला आहे. मोरु- माझ्या कानात बिलकूल मळ नाही. मनुष्य- दुसऱ्याची उपेक्षा करण्याचा मळ सर्वांच्या कानांत सारखाच भरुन राहिला आहे. माझ्या आजूबाजूला मला सारखे रडणे ऐकू येत आहे. मोरु- मला दाखवा, मला ऐकवा. मनुष्य- हे झाड रडत आहे. ती पलीकडे चरणारी गाय रडत आहे. मोरु- हे झाड काय म्हणते? मनुष्य- 'सारे लोक माझी फुले व फळे तोडून नेतात. एक सुद्धा माझ्याजवळ ठेवीत नाहीत. सारे मला लुटतात. परंतु मला पाणी कोणी घालीत नाही. माझ्या मुलांना खाली अंधारातून पाण्यासाठी किती लांबवर धडपडत जावे लागते. परंतु माणसांना माझे कष्ट दिसत नाहीत. खुशाल येतात, दगडधोंडे मारतात. फुले तोडतात, फळे पाडतात, पाने ओरबाडतात,' असे म्हणून झाड सारखे रडत आहे. मोरु- ती गाय का रडत आहे? मनुष्य- तिला प्यायला पाणी नीट मिळत नाही, खायला पोटभर मिळत नाही. तिचा मुलगा गाडीला जोडतात. नांगराला जोडतात. व त्याच्या अंगात बोट बोट खोल आर भोसकतात! बिचारा बैल! त्याला नाही पोटभर दाणावैरण. तो किती ओढील? किती चालेल? मुलाचे हे हाल पाहून गाय रडत आहे. स्वत:च्या दु:खाचे तिला फारसे वाटत नाही, परंतु मुलाच्या दुखाने ती वेडी झाली आहे. तिच्या डोळ्यांतील पाण्याचा भूमातेवर अभिषेक होत आहे. मोरु- तुम्हाला ऐकू येते, तसे मलाही येऊ दे. मला ही शक्ती द्या. मनुष्य- मनुष्य विचारी झाला, मनाने निर्मळ झाला की, त्याला ही शक्ती येते. सर्व चराचराची भाषा त्याला समजू लागते, तारे आणि वारे, पशू आणि पक्षी, दगड आणि धोंडे, नद्या आणि नाले, झाड आणि माड साऱ्यांची सुख-दु:खे मग तो जाणतो. तुमच्या गावातील नदी तर सारखी रडते. तिचे पाणी ते तिच्या अखंड गळणाऱ्या आसवांचेच जणू आहे. मोरु- ती काय म्हणते? मनुष्य- लोक तिच्यात घाण करतात. जणू तिचं सत्वच पाहतात. तिच्यात शौच करतात. लघवी करतात! शेतातील शेंगा वगैरे आणून तिच्या पात्रात धुतात, सारे पाणी घाण करतात. तिला का बरे वाईट वाटणार नाही? परवा तहानलेली पाखरे चोच वासून आली; परंतु त्यांनाही ते पाणी पिववेना; तहानलेली वासरे आली; परंतु पाणी हुंगून निघून गेली. माणसाला शिव्याशाप देत ती निघून गेली. सारी सृष्टी आज माणसाला शिव्याशाप देत आहे. मोरु- तुमची शक्ती एक दिवस तरी मला द्या. मनुष्य- बरे, तू आज गेलास की, ही शक्ती तुला येईल. काम करून, जेवण करून व अभ्यास करून अंथरुणावर पडलास की, तुला ही शक्ती येईल. आजच्या रात्रभरच फक्त ही शक्ती राहील. सकाळ होताच ती निघून जाईल. मोरु- बरे, मी जातो.
